मुंबईत (Mumbai) विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत एप्रिल 2023 मध्ये तब्बल 2 लाख 46 हजार विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून 16 कोटी 76 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांवर केलेल्या या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यावर आळा बसणार आहे. यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या कमी होण्यास देखील मदत होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी प्रवास घडावा यासाठी मुंबई उपनगरीय लोकल, मेल / एक्स्प्रेस, तसेच पॅसेजर आणि सुट्टीकालीन विशेष ट्रेनमधील विनातिकीट / अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एप्रिलमध्ये तिकीट तपासणी पथकाने मोहीम राबवून फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या. पश्चिम रेल्वेवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दोन लाख 46 हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून 16 कोटी 76 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. मुंबई उपनगरीय विभागातून वसूल करण्यात आलेल्या चार कोटी 71 लाख रुपये दंडाचा त्यात समावेश आहे. एप्रिल 2023 मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह दोन लाख 46 हजार विनातिकीट प्रवाशांना पकडून 16.76 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत एप्रिलमध्ये सहा हजार 300 हून अधिक विनातिकीट प्रवाशांना दंड आकारण्यात आला. तसेच, त्यांच्याकडून 21 लाख 34 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत यात 238.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.