Megablock (Photo Credits:Twitter)

मुंबईच्या मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway)  आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गांवर रविवारी जम्बोब्लॉकचे (Megablock)  नियोजन करण्यात आले होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेने आजचा कल्याण (Kalyan)  ते ठाणे (Thane)  दरम्यान अप जलद मार्गावर घेण्यात येणार ब्लॉक रद्द केल्याचे समजत आहे.  याविषयी रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. यामुळे मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉकचे वेळापत्रक कायम आहे. परिणामी हार्बर, पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या सुमारे 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहे.

मध्य रेल्वे ट्विट

(हे ही वाचा - पुणे, कोल्हापूर शहरातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्ट पर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द)

पश्चिम रेल्वे

सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांमध्ये डाऊन धीम्या रेलमार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. परिणामी अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे विलेपार्ले स्थानकात दोन वेळा लोकल थांबवण्यात येणार असून राम मंदिर स्थानकात फ्लॅटफॉर्म नसल्यामुळे लोकल थांबणार नाही.

हार्बर रेल्वे

सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकात अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या दरम्यान सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येईल. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य-पश्चिम मार्गावर प्रवास करण्याची सूर देण्यात आली आहे.

मागील काही दिवसात पावसामुळे मुंबईचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते. याचा पहिला परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर झाला होता, ज्यामुळे मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावर बऱ्याचदा लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येत होत्या. मागील रविवारी मात्र तुफान पाऊस असतानाही रेल्वेची वाहतूक सुरळीत चालू होती, तसेच मेगाब्लॉकही रद्द केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता.