मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे लोकल 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळची ऑफिसला जाण्याची वेळ त्यात वाहतूकीचा झालेला खोळंबा आणि त्यामुळे वाढलेली गर्दी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडाची रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसंच लवकरच वाहतूक पूर्ववत होईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
काल (10 जून) झालेल्या पहिल्या पावसामुळे कोपर स्थानकामध्ये पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला आणि मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. आज पुन्हा एकदा मध्य मार्गावरील वाहतुकीच्या खोळंब्यामुळे चाकरमान्यांसह प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.