मुंबई: लालबाग परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने आजपासून 7 दिवस पूर्णपणे बंद
लालबाग बंद (Photo Credits-Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांवर दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधित कोरोना संक्रमित रुग्ण असल्याने त्यांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. कन्टेंटमेंट झोन आणि रेड झोन येथे लॉकडाउनच्या नियमांचे कठोर पालन केले जात असून तेथे 24 तास पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवला जातो. याच दरम्यान आता, मुंबईतील लालबाग (Lalbaug) परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजपासून 7 दिवस या ठिकाणी पूर्णपणे बंद पाळण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका आणि काळाचौकी पोलीस ठाणे यांच्या झालेल्या बैठकीत लालबाग मध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लालबाग परिसर आता बंद राहणार आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. तसेच नागरिकांना सुद्धा स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारला कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले आहे. परंतु कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हटले आहे.(Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलातील 786 कर्मचारी COVID-19 पॉझिटीव्ह; 88 अधिकाऱ्यांसह 698 पोलिसांचा समावेश)

दरम्यान, मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सद्यची कोरोनाची स्थिती पाहता लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेल्याने आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने आपण कोरोनावर मात करण्यास यशस्वी होणार असल्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे.