राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत (Mumbai) पावसाचा जोर आणखीच वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. एकीकडे धरणाच्या पाणीसाठ्यात (Dam Water Storage) मोठी वाढ झाली असली तरी मुंबईत काही भागात अद्यापही 10 टक्के पाणीकपात ही लागू आहे. पाणीसाठ्यात झालेल्या मोठ्या घटीमुळे जुन महिन्यात पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र आता पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यानंतर ही पाणीकपात रद्द करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा - Conjunctivitis In Mumbai: मुंबई मध्ये डोळे येण्याच्या साथीच्या रुग्णांमध्ये वाढ; BMC कडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन)
मुंबईत सध्या 10 टक्के पाणीकपात सुरू आहे. पाणीसाठा वाढलेला असला तरी दहा टक्के पाणी कपात रद्द करण्यासाठी अद्याप मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन मुंबईतील पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांत 75 टक्के पाणीसाठा जमा झाला.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून 10 लाख 70 हजार दशलक्ष लीटर पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी 4 धरण हे सध्या 100 टक्के ही भरली असून 3 धरणे ही सध्या लवकरच भरतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवरील पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे.