मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी 4 नोव्हेंबर ते 28 मार्च पर्यंत बंद; विमान तिकीट महागण्याची शक्यता
Mumbai Airport (Photo Credit: PTI)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची (Mumbai International Airport) मुख्य धावपट्टी (Main Runway) तांत्रिक आणि डागडुजीच्या कामासाठी आज 4 नोव्हेंबर पासून ते 28 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत दुय्यम धावपट्टीवरून विमान उड्डाणे होणार असल्याने विमान फेऱ्या घटण्याचा अंदाज आहे परिणामी प्रवाशांना काही प्रमाणात महाग दरात तिकीट खरेदी करावे लागू शकते. या कालावधीत काही खास दिवशी मात्र मुख्य धावपट्टीवरूनच उड्डाणे होतील यामध्ये 25 डिसेंबर (नाताळ), 1  जानेवारी (नवीन वर्ष), 19 आणि 21 फेब्रुवारी, 10 आणि 25 मार्च या दिवसांचा समावेश असेल.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विक्रम; एका दिवसात सांभाळली 1007 विमानं

प्राप्त माहितीनुसार,मुख्य धावपट्टीची पुनर्बांधणी व अन्य कामांसाठी 1 नोव्हेंबर पासून सुरूवात होणार होती, मात्र पावसामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली. या कामामुळे मुख्य धावपट्टी 4  नोव्हेंबर पासून सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30  पर्यंत म्हणजे दिवसातून किमान आठ तास बंद ठेवण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता विमान फेऱ्या आणि सेवांची आखणी करण्यासाठी विमान कंपन्यांना वर्षभर आधी सूचित करण्यात आले होते. दरम्यान या दुरुस्तीनंतर धावपट्टीचे आयुष्य सात वर्षाने वाढणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सद्य स्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीवरून ताशी 46 विमाने उतरतात, उड्डाण घेतात. तर दुय्यम धावपट्टीची ताशी 36 विमान वाहतुकीची क्षमता आहे. मुख्य धावपट्टी बंद असताना या धावपट्टीची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत पण तत्पूर्वी या काळात विमान कंपन्यांकडून प्रतिदिवशी 26 विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.