गेल्या काही काळापासून देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईची हवा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित (Mumbai Air Pollution) होत आहे. हवा प्रदूषणाबाबत केवळ मुंबईच नाही तर दिल्ली आणि कोलकाता शहरांचीही अवस्था वाईट आहे. मुंबईत (Mumbai) हवेची गुणवत्ता दिवसागणिक ढासळत चालल्याचं चित्र आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) गांभीर्याने नोंद घेत केंद्र तसेच राज्य सरकार आणि महानगरपालिकेला (BMC) प्रश्न विचारले आहेत. मुख्य न्यायमूर्तींनी खालवत्या हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करत सुमोटो याचिका दाखल केली. मुंबईती वाढतं प्रदूषण हे अत्यंत चिंताजनक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. (हेही वाचा - Mumbai Air Pollution: मुंबई ठरले जगातील 7 व्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर; जाणून घ्या दिल्ली, कोलकाता शहरांची स्थिती)
याबाबत केंद्र आणि राज्य सरकार यासह मुंबई महानगरपालिका देखील गंभीर आहे असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं कोणती पावलं उचलली जाणार आहेत, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालायाने दिले आहेत. दरम्यान 6 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असून या सुनावणीत अहवाल सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिलेत.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व सरकारी तसेच खाजगी संस्था, संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच घेतली होती.