मुंबई मध्ये आज (27 मे) दिवशी दादर पोलिस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल शरद तुकाराम मोहिते यांची कोरोना विरूद्धची लढाई अयशस्वी ठरली असल्याचं वृत्त महाराष्ट्र पोलिस खात्याकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देताना त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. आज देण्यात माहितीनुसार, पोलिस खात्यामध्ये एकूण 1964पोलिस कोरोनाबाधित असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1095 जणांवर उपचार सुरू असून 849 पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रातील 1964 पोलिस कोरोना व्हायरसच्या विळख्यात; मागील 24 तासांत 75 नव्या कोरोनाग्रस्त पोलिसांची भर.
आज मागील 24 तासामध्ये 75 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस कर्मचार्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 60 लाखाची मदत दिली जाणार आहे. ही मदत 48 तासांत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाराष्ट्र पोलिस ट्वीट
हेड कॉन्स्टेबल शरद तुकाराम मोहिते, दादर पोलीस ठाणे, मुंबई, यांच्या मृत्यूबद्दल कळविण्यास अत्यंत खेद होत आहे. ते कोरोनाव्हायरसशी झुंज देत होते.
पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 27, 2020
मुंबई मध्ये पोलिसांवरील कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यानचा तणाव पाहता केंद्र सरकारचे निमलष्करी दलाचे कर्मचारी दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील हॉटस्पॉट्समध्ये आता निमलष्करी जवान तैनात करून मुंबई पोलिसांना काही काळ आराम देण्याचा प्रयत्न केला जात आहे.