मुंबई-गोवा महामार्गावर एसटीचा भीषण अपघात; 20 प्रवासी जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) माणगावजवळ (Mangaon) एसटीचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला. माणगावजवळ एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे या बसमधील प्रवासी 20 जखमी झाले असून 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये आणि खऱ्या गुन्हेगारांना संरक्षण मिळावे यासाठी एनआयएकडे तपास - शरद पवार)

अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 44 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सरकार रस्ते अपघात थांबवण्यासाठी विविध उपक्रम राबवताना दिसते. परंतु, सरकाराला या उपक्रमात यश मिळत नाही. 2018-19 मध्ये राज्यात जानेवारी ते मार्च दरम्यान तब्बल 9 हजार 96 रस्ते अपघात झाले. या अपघातात 3 हजार 434 लोकांचा जीव गेला. त्यामुळे रस्त्यावरील अपघात हा चिंतेचा विषय ठरला आहे.

रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये महाराष्ट्राची स्थिती अत्यंत वाईट असून देशामध्ये होणार्‍या रस्ते अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. 2018 मध्ये या प्रकारच्या अपघातांत 13,226 जणांनी प्राण गमावले होते. 2017 च्या तुलनेत हा आकडा 8.1 टक्क्यांनी वाढला आहे.