लवकरच मुंबई ते गोवा (Mumbai-Goa) हे अंतर अवघ्या 7 तासांत पार करता येणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोवा हा ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे तयार करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. मुंबई ते गोवा हे अंतर 590 किलोमीटर असून सध्या हे अंतर रस्त्याने कापण्यासाठी 12 तास लागतात. महामार्ग 2016 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता आणि प्रकल्प पूर्ण करण्याची तात्पुरती अंतिम मुदत 2018 होती, जी प्रक्रियात्मक विलंबामुळे पूर्ण होऊ शकली नाही.
नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे महामार्गाच्या धर्तीवर हा महामार्ग बांधण्याची घोषणा केली. या बहुउद्देशीय प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्याची दुर्दशा पाहता राज्य सरकार समुद्रकिनारी हा नवीन द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने काम करत आहे.
कोकणातील समुद्र किनार्यावरून तयार करण्यात येणार्या चौपदरी कोस्टल ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेवरून मुंबई ते गोवा हे अंतर सात ते आठ तासांत पार करता येणार आहे. हा द्रुतगती मार्ग कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या सागरी किनाऱ्यावरून जाणार आहे. सिंधुदुर्गकडे जाणारा कोस्टल रोड आधीच कोकणात अस्तित्वात आहे, जो कमी रुंदीचा आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची योजना आहे.
केंद्र सरकारच्या मुंबई आणि कन्याकुमारी दरम्यानच्या 1,622 किमी लांबीच्या आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग म्हणून, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करत आहे. हा महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. कोकणात जलद वाहतूक साधनांसह पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने कोस्टल एक्सप्रेस वे बांधण्याची योजना आखली आहे. कोकणाला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणतात. येथे अफाट हिरवळ आणि 500 किमी पेक्षा जास्त समुद्र किनारा आहे. किनारी कोकण विभागातील मागास भागांचा विकास होऊन ग्रीन फिल्ड द्रुतगती मार्गाच्या उभारणीमुळे मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन दरवाजे खुले होणार आहेत. (हेही वाचा: Hop On-Hop Off Bus: मुंबईत हॉप ऑन-हॉप ऑफ बस सेवा सुरू; जाणून घ्या कुठे कराल बुकिंग)
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून ते 11 टप्प्यांत होणार आहे. युनायटेड स्टेट्समधील लॉस एंजेलिस-सॅन फ्रान्सिस्को महामार्ग 1 च्या धर्तीवर हा मार्ग बांधण्याची अधिकाऱ्यांची योजना आहे. यूएस हायवे समुद्राला समांतर जातो आणि जगातील सर्वात नयनरम्य रस्त्यांपैकी एक समजला जातो. दरम्यान, मुंबई ते कोकण आणि गोव्याकडे होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गाला 12 वर्षे अगोदर मंजुरी देण्यात आली होती. या महामार्गाच्या दुर्दशेबाबत अनेक आंदोलनेही झाली आहेत.