प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

आज घाटकोपरच्या (Ghatkopar) दिशेने जाणाऱ्या लोकलवर एका अज्ञात व्यक्तीने दगड फेक केल्यामुळे एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर जखमी झालेल्या व्यक्तीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

गणेश राम असे व्यक्तीचे नाव असून आपले काम संपवून घरी जात होते. त्यावेळी घाटकोपरच्या दिशेने जात असताना नित्यानंद पूल ओलांडत असताना एका समाजकंटकाने लोकलच्या दिशेने दगड भिरकावला. तर भिरकवलेला दगड लोकलच्या आतमध्ये जात गणेश राम यांच्या डोक्याला जोरात लागला. त्यावेळी लोकलच्या डब्यामधील नागरिकांनी त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

(मध्य रेल्वेच्या विस्कळीत कारभारामुळे प्रवासी त्रस्त, घाटकोपर, ठाण्यात 5 जण जखमी)

यापूर्वीसुद्धा लोकलवर दगड फेक करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यामध्ये दोन तरुणी आणि एका व्यक्तीला दुखापत झाली होती. तसेच डोंबिवलीतसुद्धा दारुची बॉटल फेकून मारल्याने महिला जखमी झाली होती. तर लोकलवर दगड फेक करण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.