4 वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील (Mumbai) एक वृद्ध दांपत्य दोषी आढळले आहे. 2013 मध्ये झालेल्या या घटनेवर स्पेशल POCSO कोर्टाने त्या वृद्ध दांपत्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 50,000 चा दंड ठोठावण्यात आला असून महिन्याभराच्या आत तो भरण्याचा आदेश स्पेशल कोर्टच्या जज रेखा एन. पांढरे (Rekha N Pandhare) यांनी दिला आहे. जोडप्यातील पत्नीचे वय 81 तर पतीने 87 वर्ष आहे. (कल्याण: 6 अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका शिक्षकाला अटक)
लैगिंक अत्याचाराची घटना 4 सप्टेंबर 2013 मध्ये घडली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडीत चार वर्षीय मुलगी मैत्रिणीच्या घरुन परतत असताना या जोडप्याने तिला बोलावले. ती त्यांना आजी-आजोबा असे म्हणत असे. ती जवळ गेली असता जोडप्याने तिला घरात नेले. ती निघून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना कानाखाली मारुन तिला गप्प करण्यात आले. त्यानंतर दोषी पती तिच्यावर लैगिंक अत्याचार करत असताना पत्नीने त्या मुलीला धरुन ठेवले.
मुलीला सोडून दिल्यानंतर ती आपल्या घरी पळाली आणि झालेला सर्व प्रकार तिने आपल्या आईच्या निर्दशनास आणून दिला. लैंगिक शोषण झाल्याच्या खूणा तिच्या शरीरावर आढळल्या. यानंतर त्या दांपत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या दिवशी दोघांनाही अटक करण्यात आली. मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.
पीडित मुलगी, तिची आई आणि मेडिकल रिपोर्टच्या आधारावर दांपत्यांला Protection of Children from Sexual Offences अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली. पीडित मुलगी ही दोषींच्या नातीच्या वयाची असल्यामुळे त्यांनी तिची काळजी घेणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी तिचा लैगिंक छळ केल्याचे कोर्टाने सांगितले.