मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 10 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2438 वर पोहचला, महापालिकेची माहिती
Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे आणखी 10 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2438 वर पोहचला आहे. तसेच या ठिकाणी सध्या 102 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. दाटीवाटीने असलेल्या या लोकवस्तीत कोरोनाचा सुरुवातीला प्रचंड प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले होते. मात्र महापालिकेने या ठिकाणी वेळोवेळी कोरोनाची परिस्थिती समजून घेत उपाययोजना केल्याने येथील परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली आहे. तर काही दिवसांपूर्वीच

धारावी पॅटर्नचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. कोरोनावर मिळवलेले नियंत्रण हे जगासाठी आदर्श असेल असे ही त्यांनी म्हटले होते.

कोरोना प्रादर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे.(मातामृत्यू दर कमी करण्यात महाराष्ट्राला मोठे यश; देशात केरळ नंतर राज्याचा दुसरा क्रमांक)

गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णवाढीचा दर मंदावल्याचे संकेत मिळाल्यामुळे धारावीकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रांपैकी दोन केंद्रे अखेर बंद करण्यात आली आहेत. एकेकाळी मुंबईतील कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे विभाग आता आटोक्यात आल्याचे चित्र आहे. वरळी, वांद्रे, भायखळा, नागपाडा, कुर्ला, माटुंगा, वडाळा, देवनार, मानखुर्द हे भाग आता रुग्णवाढीत सगळ्यात खालच्या क्रमांकावर आले आहेत.