मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाल्याने COVID19 रुग्णांचा आकडा 1733 वर पोहचला
Coronavirus | Photo Credits: Unsplash

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसाच प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात घरी थांबण्यासह काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर राज्यातील मुंबई आणि पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. परंतु मुंबईतील सर्वात मोठी झोपटपट्टी असणाऱ्या धारावीत सुद्धा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. येथे आज नवे 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एका व्यक्तीचा बळी गेल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. धारावीत सध्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1733 वर पोहचली असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परंतु राज्य सरकार या परिस्थितीतीला सामना करण्यासाठी सक्षम असून त्याबाबत आतापासूनच तयारी करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचा वेग संथ जरी झाला असला तरीही त्याची साखळी तुटली नसल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. कोरोनाग्रस्त रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी सुद्धा जीवतोडून उपचार करत आहेत.(महाराष्ट्र: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास पहिल्या वेळेस 1 हजार रुपयांच्या दंडासह एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

तर शुक्रवारी महाराष्ट्र राज्यात 2682 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व अशा प्रकारे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 62,228 अशी झाली आहे. मात्र यामध्ये एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला आहे. आज एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 7358 रुग्ण मुंबई मनपा क्षेत्रातील असल्याचे सांगण्यात आले आहे.