Mumbai Crime News: मुंबईतील कुर्ला (Kurla) येथे रविवारी सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेचा मृतदेह एका बंद बॅगेत आढळून आला आहे. रविवारी सकाळी 11.30च्या सुमारास एका पादचाऱ्याला सीएसटी रोडजवळील पुलाखाली एक बॅग दिसली. पोलिसांना या अनोळख्या बॅगेची माहिती देण्यात आली.पोलिस घटनास्थळी आले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कुर्ला पोलिस ठाण्यात फोन आला आणि अज्ञात बॅगेविषयी माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आले, बॅग तपासल्यावर बॅगेत महिलेचा मृतदेह सापडला. मृताचे वय २० ते २५ वर्षाच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेचे कपडे व्यवस्थित होते म्हणजे प्रथमदर्शनी, महिलेवर लैंगिक अत्याचार झाला नसावा, तसेच शरिरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाही. गळ्या भोवती काही खुना आढळल्या त्यामुळे गळा आवळून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कुर्ला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी बॅग सापडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यात काही पुरावे सापडले नाहीत. कुर्ला पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचाही तपासात सहभाग आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी अधिकारी सर्व पोलिस ठाण्यातून बेपत्ता महिलांची माहिती गोळा करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला.