क्रिकेट (Cricket) खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरुन एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना (Mumbai Crime) मुंबई शहरातील घाटकोपर (Ghatkopar) परिसरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV Footage) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा हल्ला नेमका क्रिकेट खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरुन घडला आहे की, त्यामागे काही पूर्ववैमनस्याचे कारण आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. मुंबई पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून प्राप्त तक्रारीवरुन तपास सुरु केला आहे. आहे.
घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, घाटकोपर परिसरातील कुर्बानशाह दर्ग्याजवळ काही लोक क्रिकेट खेळत असत. या परिसरात लोकांची घरं आणि दुकानं आहेत. या क्रिकेटमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत होता. या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या नागरिकांना अनेकदा चेंडूचा मारही लागला आहे. त्यामुळे अनेकांनी क्रिकेट खेळणाऱ्या मंडळींबाबत नाराजी व्यक्त केली होती. (हेही वाचा, क्रिकेटपटू Babu Nalawade याचा खेळताना मृत्यू; नीयतीने क्रिकेटच्या मैदानावर घेतली त्याच्या आयुष्याची विकेट)
दरम्यान, रविवारीही असेच घडले. या परिसरात काही लोक क्रिकेट खेळत होते. या ठिकाणी क्रिकेट खेळण्यास स्थानिकांनी विरोध केला. या वेळी क्रिकेट खेळणारे आणि स्थानिक यांच्यात क्रिकेट खेळण्यावरुन वाद झाला. बाचाबाचीतून झालेली ही सुरुवात पुढे हाणामारीपर्यंत गेली. यातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्याच रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. हाणामारीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाली आहे.
दरम्यान, प्राप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज आदींच्या आधारे घाटकोपर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम कलम 326, 323, 427, 34, 504 अन्वये 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे.