मुंबई: चिल्ड्रन होम मधील 268 पैकी 84 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे तर 30 बालकांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह
Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा आकडा झपाट्याने वाढत आहे. याच दरम्यान राज्यातील मुंबईत ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या लाखांच्या घरात पोहचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या काळात घरातील तरुणांपासून ते वयोवृद्धांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. याच दरम्यान आता मुंबईतील चिल्ड्रन 268 पैकी 84 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली असून 30 बालकांची कोविड19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामधील दोन मुलांना कर्करोग असल्याने त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा  1 लाख 7 हजार 981 वर पोहचला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याकडे सरकार प्रामुख्याने लक्ष देत आहे. तसेच कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्यांनी त्या संबंधित चाचणी करावी असे आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात येत आहे. राज्य सराकरच्या काही रुग्णालयात कोविड रुग्णांसह नॉन-कोविड रुग्णांवर सुद्धा उपचार करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईतील नायर रुग्णालयाचा सुद्धा समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वीच महापालिकेने शहरातील राज्य सरकारची 16 पैकी 9 रुग्णालयांचे आता नॉन-कोविड सेंटर्समध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.(औरंगाबाद येथे कोरोनाच्या आणखी 34 रुग्णांची नोंद, जिल्ह्यातील COVID19 चा आकडा 12 हजार 942 वर पोहचला)

कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर्स, नर्स, वैद्यकिय कर्मचारी रुग्णांवर अहोरात्र उपचार करुन त्यांची प्रकृती सुधरावत आहेत. तसेच राज्यात कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र उर्वरित ठिकाणी 'मिशन बिगिन अगेन' नुसार काही गोष्टी अनलॉकिंगनुसार सुरु करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.काल 25 जुलै पर्यंत देशात एकूण 3 लाख 66 हजार 368 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 9 हजार 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण हे कालच्या दिवसातील आहेत.