दादर रेल्वे स्थानकातील भिंतींचे कायापालट (Photo Credits-Twitter)

सध्या देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालल्याने लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे घरात बसून कंटाळलेल्या नागरिकांना आपले छंद जोपासण्यास वेळ मिळत आहे. याच दरम्यान आता मुंबईतील दादर येथे मध्य रेल्वे स्थानकात भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे रुप पालटले आहे. लॉकडाउनच्या काळात अशा पद्धतीने भितींवर चित्र काढल्याने त्याची शोभा अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. तर राज्यातील विविध ठिकाणी स्थानिक कलाकारांकडून सुद्धा कोरोनासंबंधित जनजागृती करण्यात येत असल्याचे दिसून आले होते.

मध्य रेल्वे स्थानकातील भिंतींचे रंगकाम करण्यात आले आहे. यामध्ये फक्त रंगकामच नव्हे तर चित्र सुद्धा काढण्यात आले आहे. यामध्ये पोलीस दलासंबंधित चित्र रेखाटण्यात आली आहेत. सध्या कोरोनामुळे जसे वैद्यकिय कर्मचारी अहोरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य रस्त्यावर गस्त घालून बजावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.(महाराष्ट्र: नाशिक येथे IT कंपनीचे कर्मचारी कामावर पुन्हा परतले असता त्यांची स्क्रिनिंगद्वारे तपासणी)

दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे तर मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 हजारांच्या पुढे गेला आहे. मुंबई क्षेत्र सध्या रेड झोनमध्ये दाखल झाले असून नागरिकांना स्वत:ची काळजी घ्यावी असे ही सांगण्यात आले आहे.