मुंबई आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून (Mumbai Rain) जोरदार पाऊस सुरू आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. कांदिवली येथे डोंगराचा भाग कोसळल्याने मीरा रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. मुसळधार पावसाचा मुंबई लोकल ट्रेनवरही (Mumbai Local Trains) मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे (Central Line) धीम्यागतीने धावत आहे. तसेच कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे (Harbour Line) वाहतूक थांबली आहे.
रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे.
एएनआयचे ट्वीट-
Mumbai: Central Line running slowly. Rail traffic on Harbour line stopped between Kurla- CSMT. Traffic on all 4 lines stopped, due to heavy rainfall.
— ANI (@ANI) August 4, 2020
हवामान विभागाने मुंबई आणि परिसरास सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात केवळ हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानेच हजेरी लावली. दिवसभरात केवळ काही सरींपुरताच पाऊस मर्यादीत होता. सायंकाळी उशिरा दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईत जोरदार पावसाच्या सरी आल्या. या भागात सुमारे 20 ते 40 मिमी पाऊस झाला. तर भायखळा आणि परिसरात ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. पश्चिम उपनगरे, मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरात 10 ते 20 मिमी पावसाची नोंद झाली.