CheckIn Master App by Central Railway (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रामध्ये वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत तसेच विकेंड लॉकडाऊनचे आदेश आहेत. मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी खोटी वृत्त पसरवत असल्याचं समोर आलं अअहे. यापैकीच एक म्हणजे श्रमिक ट्रेन सुरू करण्याबाबातची माहिती तसेच मुंबईतच्या स्टेशनवर मजुरांची गर्दी. याबाबत 7 एप्रिल 2021 दिवशी काही जुने व्हिडिओ देखील शेअर करण्यात आले आहेत. पण रेल्वे प्रशासनाने अशी वृत्त फेटाळली आहे. आता ज्या फोन नंबर वरून जुन्या गर्दीचे फोटो, व्हिडीओज जे करण्यात आले होते त्या अज्ञात व्यक्ती विरूद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. नक्की वाचा: महाराष्ट्र: रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही श्रमिक गाड्या सुरु करण्यात आलेल्या नाही, मुंबई लोहमार्ग पोलिसांनी अफवांना बळी न पडण्याचे केले आवाहन.

TOI च्या वृत्तानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील गर्व्हेमेंट रेल्वे पोलिस (GRP) यांच्याकडे मध्य रेल्वेने तक्रार नोंदवली आहे. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या नंबर वरून क्लिप सोशल मीडियात पोस्ट झाली आहे त्याची दखल घेण्यात आली असून तो नंबर पोलिसांना देण्यात आला आहे.

दरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून राज्यातील ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंधांमुळे तिकीट बुकिंगची, प्रवाशांची संख्या वाढली नसल्याचं सांगितलं आहे. ज्या लोकांकडे कंफर्म तिकीट आहे ते रेल्वेने प्रवास करत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी रोखली जाणार आहे.

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील फेक न्यूज पसरवणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल असा सज्जड दम भरला आहे.