Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता लवकरच लॉकडाऊन जाहीर होणार या भीतीने स्थलांतरित मजूरांनी गावाकडची वाट धरली. अनेकांनी आपल्या घरचा रस्ता धरला असून तेथे जाण्यासाठी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांत गावी जाण्यासाठी गर्दी केली. दरम्यान सोशल मिडियावर श्रमिक विशेष रेल्वे (Shramik Special Railway) सुरु करण्यात आल्याची बातमी वा-यासारखी पसरली. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी स्थलांतरित मजूरांनी गर्दी केली होती. मात्र "रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या नसल्याची" माहिती मुंबई लोहमार्ग पोलिसांनी (GRP Police) ट्विटद्वारे दिली आहे. तसेच कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या भीतीने हातावर पोट असणारे अनेक मजूर गेल्या 2 दिवसांपासून सैरावैरा धावत सुटलेत. लॉकडाऊनची घोषणा होण्याच्या आधीच आपल्या गावी परतावे या भीतीने अनेकांनी मुंबईतील लोकमान्य टिळक आणि अन्य रेल्वे स्थानकांत गर्दी केली होती. त्यात सोशल मिडियावर श्रमिक विशेष गाड्या चालविल्या जात असल्याची चुकीची माहिती पसरल्याने त्यांची आणखीनच धांदल उडाली. मात्र यात काहीही तथ्य नसून अशा कुठल्याही श्रमिक रेल्वे सोडण्यात आलेल्या नाही असे मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सांगितले आहे.हेदेखील वाचा- Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही; कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

त्याचबरोबर रेल्वे फक्त उन्हाळी विशेष गाड्या आणि नियमित विशेष गाड्या चालवत आहे. लोकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. केवळ कंफर्म तिकीट धारकांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे. असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रात महाराष्ट्रात मागील 24 तासांत 55,411 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे. तर मागील 24 तासांत 309 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 57,638 वर पोहोचला आहे. दरम्यान राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत आज मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक झाली. मात्र यावर अंतिम निर्णय झाला नसून उद्या टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे.