Mumbai Building Collapse Update: फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा भाग कोसळल्याच्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, NDRF ची माहिती
Bhanushali Building Collapses (Photo Credits-ANI)

मुंबईतील फोर्ट या ठिकाणी असलेल्या भानुशाली इमारतीचा गुरुवारी भाग कोसळल्याची दुर्घटना घडली होती. त्यावेळी अग्निशमन दलासह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर या ठिकाणी बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले होते. तर या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एनडीआरएफ कडून देण्यात आली आहे. या ठिकाणी काल खासदार अरविंद सावंत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती.(Mumbai Building Collapse Update: फोर्ट येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू; बचावकार्य अद्याप सुरु)

अरविंद सावंत यांनी घटनास्थळी भेट देत असे म्हटले होते की, या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. तर इमारतीचा भाग कोसळल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढले जाईल असे स्पष्ट केले होते. तसेच इमारत कोसळल्यानंतर जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात ही दाखल करण्यात आले आहे.(मुंबई: मालाड मध्ये मालवणी परिसरात दुमजली चाळीचा भाग कोसळला; बचावकार्य सुरू)

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली होती. तर मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसत आहे. यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये मरीन लाईन्स, ग्रॅंट रोड या दोन ठिकाणी इमारतीचा काही भाग कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.