Mumbai Building Collapse Update: फोर्ट येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू; बचावकार्य अद्याप सुरु
Mumbai Building Collapse (Photo Credits: ANI)

मुंबईतील (Mumbai) फोर्ट (Fort) येथे भानुशाली इमारतीचा (Bhanushali Building) भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अजून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ANI वृत्तसंस्थेने ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, NDRF च्या जवानांनी अजून एक मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढला आहे. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 6 झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील पाचमजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भिंत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्याा गाड्या, अम्बुलन्स आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली होती.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ची ही इमारत असून यात एकूण 20 कुटुंब राहत होती. काल मुसळधार पावसामुळे या इमारतीचा काही भाग कोसळला. त्यानंतर NDRF च्या मदतीने बचतकार्य सुरु झाले. दरम्यान या ढिगाऱ्यातून 23 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. (मुंबई: फोर्ट येथील एका इमारतीचा भाग कोसळला, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल)

ANI Tweet:

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी भेट देवून दुर्घटना स्थळाची पाहाणी केली. तसंच सुरु असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली.