Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई महापालिकेकडून के-वेस्ट वॉर्डसाठी ऑन व्हिल लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार बेस्टच्या एसी मिनी बसच्या माध्यमातून ही सेवा नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्टर, महापालिकेचे कर्मचारी आणि लस ठेवण्यासाठी फ्रिजची सोय करण्यात आली आहे. या वॅनमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. के-वेस्ट वॉर्डाचे असिस्टंट म्युनसिपल कमिशनर पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर म्हटले की, नागरिकांकडून यासाठी उत्तम प्रतिसाद दिला जात आहे.

15 ऑक्टोंबर रोजी 145 जणांनी लस घेतली. आमच्याकडे 27 महापालिकेची लसीकरण केंद्रे आहेत. पण आम्ही अशा पद्धतीचे सुद्धा लसीकरण सुरु केले आहे. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाण जसे जुहू बीच येथील धार्मिक स्थळ, मार्केटच्या ठिकाणी सुद्धा लसीकरणाची ही सेवा उपलब्ध करुन दिली जाईल.(Mumbai Metro 18 ऑक्टोबर पासुन फेर्‍यांमध्ये वाढ करणार; पहिली ट्रेन सकाळी 6.30 वाजता धावणार) 

के-वॉर्डातील शिवसेनेचे नगरसेवक राजुल पटेल यांनी असे म्हटले की, सोसायटी मध्ये जर थोडी जागा दिली गेल्यास तेथे सुद्धा लसीकरण केले जाईल. अन्यथा सोसायटीच्या परिसरात लसीकरण वॅन उभी केली जाईल. दोन्ही लसीचे डोस उपलब्ध करुन दिले जाणार असून नागरिकांना कोणताही एक डोस घेता येईल असे पटेल यांनी म्हटले आहे. अशाच पद्धतीने महापालिकेच्या जी-नॉर्थ वॉर्डात सुद्धा रुग्णवाहिकेचे लसीकरण वॅनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत 333 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 3 जणांचा मृत्यू झाल आहे. तर 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कालच्या तुलनेत आज नव्याने निदान झालेल्या रुग्णांची आणि मृतांची संख्या कमी आहे.