मुंबई: ट्रेन खाली येऊन मृत्यू पावलेल्या भिकाऱ्याच्या नावे लाखो रुपयांच्या FD आणि नाणी; किंमत ऐकून व्हाल हैराण
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द (Mankhurd) ते गोवंडी (Govandi) दरम्यान रेल्वेखाली येऊन 82 वर्षीय बिरादीचंद पन्नारामजी आझाद यांचा मृत्यू झाला. आझाद हे मागील बऱ्याच महिन्यांपासून ट्रेन मध्ये भीक मागायचे. या घटनेनंतर वाशी सरकारी रेल्वे पोलीस विभागाने (Vashi GRP) आझाद यांच्याबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली, पण या तपासात जे उघडकीस आले ते ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पोलिसांना ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या आझाद यांच्या नावावर बँकेत तब्बल 8.77 लाख रुपयांच्या एफडी आणि 96 हजार रुपयांची नाणी असल्याचे समजले आहे. इतकेच नव्हे तर गोवंडी येथे त्यांच्या राहत्या झोपडीत सुद्धा 1.75 लाख रुपयांची नाणी सापडली आहेत.

वरिष्ठ पोलीस नंदकुमार सस्ते यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, आझाद यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला होता. यावेळी ट्रकजवळ राहणाऱ्या स्थानिकांनी आझाद यांची ओळख पटवून दिली. गोवंडी येथील रेल्वे ट्रकजवळच आझाद एका झोपडीत एकटेच राहत होते. या झोपड्याची तपासणी करताना पोलिसांना मोठमोठया चार डब्ब्यात 1, 2, 5, 10 रुपयांची नाणी प्लास्टिकच्या पिशवीत टाकून लपवलेली आढळली. शनिवारी दुपारी पोलिसांनी ही नाणी मोजायला घेतली आणि यांची किंमत तब्बल पावणे दोन लाख रुपये असल्याचे समोर आले. इतकी मोठी रक्कम पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

यानंतर पोलिसांनी झोपड्याची पुन्हा झडती घेतली, ज्यामध्ये त्यांना आणखीन एक लपवून ठेवलेला डब्बा आढळला ज्यामध्ये आझाद यांच्या नावे पॅन कार्ड, आधार कार्ड व ज्येष्ठ नागरिक कार्ड ही सर्व कागदपत्रे सापडली. यासोबतच पोलिसांना बँकेचे फिक्स डिपॉझिट व पासबुक सारखी कागदपत्रे देखील आढळली यावरून त्यांना आझाद यांच्या नावे 8.77 लाखांच्या एफडी आणि 96,000 रुपये असल्याचे समजले. या सर्व मालमत्तेच्या वारसदारीमध्ये आझाद यांनी स्वतःचा मुलगा सुखदेव याचे नाव दिले होते.

दरम्यान, पोलिसांनी आझाद यांच्या मुलाचा तपास सुरु केला आहे. आझाद हे राजस्थानचे रहिवाशी असून रामगड येथे त्यांचे कुटुंब आहे. याबाबत शेजार्यांना देखील काहीच माहित नसल्याने आझाद आणि त्यांची मालमता हा सर्वांसाठीच मोठा धक्का असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.