Mumbai: मास्क घालण्यास नकार देवून पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीस मुलुंडमध्ये अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुरुवारी (15 एप्रिल) एका मास्क न घालणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. मास्क घालण्यास सांगितल्यावर त्याने ट्रॅफिक पोलिसांशी (Traffic Police) वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ आणि गैरवर्तन करणाऱ्या या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मुलुंड (Mulund) मध्ये काल सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. (Pune: वाहतुक पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीत 2 तरुणांकडून पोलिसांवर लोखंडी रॉडने हल्ला)

जतीन प्रेमजी या दुकानदारावर मुंबईच्या वाहतूक पोलिसांवर शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरआरटी रोडवर तैनात  दोन पोलिस कॉन्सटेबल नो-पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या वाहनचालकांविरुद्ध ते कारवाई करत होते. यावेळी जतिन याला पकडले असता त्याने पोलिसांसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर वादाला सुरुवात झाली. तसंच त्याने मास्क घालण्यासही नकार दिला. ही संपूर्ण घटना पोलिसांना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे. या घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडून अटक केली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस अत्यंत भीषण रुप धारण करत आहे. त्यामुळेच 14 एप्रिलच्या रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली असून कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. तसंच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Lockdown मध्ये बाहेर फिरताना रोखल्याने तिघांनी मिळून पोलिसांवरच केला हल्ला; पिंपरी- चिंचवड मधील धक्कादायक प्रकार)

कोविड19 संकटाच्या या कठीण काळात पोलिस जीवाची बाजी लावून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करत आहेत. परंतु, काही बेजबाबदारपणे वागणाऱ्या व्यक्तींकडून अनेकदा पोलिसांवर हल्ले केले जातात. मागील वर्षी कोरोना संकटात पोलिसांवर हल्ले झाल्याचा अनेक घटना समोर आल्या होत्या.