PUBG Mobile (Photo Credit: pcgamesn.com)

पबजी गेम (PUBG Game) खेळताना भान हरवलेल्या एका तरुणाचा (वय वर्षे 21) तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) शहरानजीक वसई (Vasai) येथे मंगळवारी (28 ऑगस्ट 2019) रात्री घडली. आकाश दीक्षित उर्फ ​​आकाश झा (Akash Dixit alias Akash Jha) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश याच्या आईने आपला मुलगा मंगळवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर या घटनेचा उलघडा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश दीक्षित उर्फ ​​आकाश झा नामक तरुण आपल्या घराजवळ असलेल्या धानीव वसई फाटा (Dhaniv Vasai Fata) येथील तलावाजवळ बसून पबजी गेम खेळत होता. बराच वेळ घरी न आल्याने आकाशच्या आईने त्याला फोन लावला. तेव्हा त्याने पबजी गेम खेळून संपल्यानंतरच मी घरी येईल असे सांगितले. परंतू, बराच काळ उलटून गेला तरी, तो परत आलाच नाही. त्यामुळे आकाशची आई त्याच्या मित्रांना घेऊन दुसऱ्या दिवशी त्याला शोधू लागली. परंतू त्याचा काहीच थांगपत्ता न लागल्याने त्याच्या आईने पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

दरम्यान, बुधवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह धानीव वसई फाटा (Dhaniv Vasai Fata) येथील तलावात तरंगताना आढळला. तरंगत्या मृतदेहाबाबत माहिती मिळताच आकाशच्या आईने तालावकडे धाव घेतली. तलावाजवळ पोहोचताच तिने मृतदेहाच्या दिशेने तलावात उडी मारली. मात्र, तिला पोहता येत नव्हते. ती बुडू लागल्याने स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला वाचवले आणि पाण्याबाहेर काढले. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात तरंगणारा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह आकाश याचाच असल्याची ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शविविच्छेदनासाठी पाठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा, असला नवरा नको गं बाई, PUBG खेळणारा हवा गं बाई)

एका पोलिस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आकाश झा याचे कुटुंबीय रोजंदारीने कामाला जातात. तर, आकाश हा मोबाईलवर पबजी गेम रात्रंदिवस खेळत असे. त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी पबजी गेम खेळण्यात तो प्रचंड मग्न झाला होता. दरम्यान, त्याचा पाय घरसला आणि तो तलावात पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्य झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची नोंद घेण्यात आली असून, तापास सुरु केला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.