मुंबई: वरळी येथे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाण्याच्या डबक्यात पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
Mumbai boy falls in an under construction site at Worli (Photo Credits: ANI)

मुंबईतील गोरेगाव येथे उघड्या गटारात पडलेल्या मुलाची घटना ताजी असतानाच आता अजून एक बातमी समोर येत आहे. वरळी येथील कोस्टल रोडजवळ बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी खोदलेल्या पाण्याच्या डबक्यात पडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ANI रिपोर्टनुसार, हा खड्डा बीएमसीने खोदला होता. अपघातानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्या ठिकाणी पहारेकरी नेमण्यात आला आहे. (मुंबई : गोरेगाव येथील गटारात पडलेला दिव्यांश सिंग बेपत्ता, 3 दिवसांनंतर प्रशासनाने थांबवली शोध मोहिम)

मृत मुलाच्या वडिलांनी एएनआय ला दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर प्रथम त्या मुलाला पोदार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने मुलाला नायर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र तिथे प्रथम कागदोपत्री औपचारीकता पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर मुलाला मृत घोषित करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे मुलाला प्राण गमवावे लागले.

ANI ट्विट:

काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील आंबेडकर नगर मधील 3 वर्षांचा मुलगा दिव्यांश सिंह हा उघड्या गटारात पडला होता. मुंबई पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान त्याला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र अद्याप त्याचा पत्ता लागलेला नसल्याने प्रशासनाने आपले प्रयत्न थांबवले आहेत.