कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. सरकारकडून जनतेला गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं तसचं स्वत: ची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातचं आता मुंबईतील आर्थर रोड (Arther Road) कारागृहातून (Jail) 400 कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील आर्थर रोड कारागृहाची क्षमता केवळ 805 कैद्यांची आहे. परंतु, सध्या या कारागृहात 3 हजार 400 कैदी राहतात. यातील अनेक कैद्यांच्या सुनावणीला वेळ आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार नाही. यातील काही प्रकरणाच्या सुनावण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. त्यामुळे या कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: पुण्यात कोरोना व्हायरसचा कहर; शाळा, महाविद्यालय सिनेमागृहानंतर आजपासून 3 दिवस ज्वेलर्सची दुकानेही राहणार बंद!)
विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कैद्यांना निसर्गोपचारही देण्यात येणार आहे. तळोजा कारागृहाची क्षमता जास्त आहे. त्यामुळे आर्थर रोडवरील कैद्यांना या ठिकाणी हलवण्यात येणार आहे. आज महाराष्ट्रात भारतातील तिसरा कोरोनाचा बळी गेला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीमय वातावरण निर्माण झालं आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्य शासनाकडून गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मनाई केली जात आहे.