मुंबई मध्ये भायखळा स्थानकात (Byculla Station) एका व्यक्तीला ओवर हेड इक्विमेंट वायर (Overhead Equipment Wire Pole) पोल वर चढणं महागात पडलं आहे. या प्रकारामध्ये त्याला शॉक लागून तो रेल्वे रूळावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी कोणतीही रेल्वे ट्रॅक वरून न गेल्याने तो बचावला आहे. त्याला तात्काळ नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार काल (25 ऑक्टोबर) दिवशीचा आहे.
शाकिर कुरेशी असं या व्यक्तीचं नाव असून तो 30 वर्षीय फळ विक्रेता आहे. शाकिरला वीजेच्या धक्क्याने काही जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी शाकिर जेजे रूग्णालयात आहे. भायखळा स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 4, सीएसएमटी कडे जाणार्या जलद मार्गावरील ट्रॅक जवळ फूट ओवर ब्रीजच्या मदतीने तो OHE वर चढला. संध्याकाळी 5.40 ला झालेल्या या घटनेची तात्काळ कंत्रोल रूमला माहिती देण्यात आली. त्यानंतर माटुंगा-भायखळा दरम्यानची पावर बंद करण्यात आली.
भायखळा रेल्वे स्टेशन पोलिस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांच्याकडून शाकिर कुरेशीला खाली उतरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र तो बधला नाही. नंतर त्याला वीजेचा धक्का बसला आणि भाजल्याच्या जखमेने खाली कोसळला. त्याला नंतर उपचारासाठी जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाला जखमा आहेत. तो भायखळा मंडई मध्ये काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.