कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आजपासून मध्य रेल्वेने सुरु केली 15 डब्यांची लोकल सेवा
मुंबई लोकल | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

मुंबईत (Mumbai) मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण (Kalyan) आणि डोंबिवलीसाठी (Dombivali) आता मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने आज रविवार (3 मार्च) पासून 15 डब्यांची लोकल सेवा सुरु केली आहे. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीकरांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेकडे 15 डब्यांच्या दुसऱ्या रेकची ही सुविधा प्रशासनाने सुरु केली आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी 15 डबे असलेली लोकल सुरु करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. त्यामुळे ठाण्यापुढील स्थानकांसाठी रेल्वे प्रशासनाने ही सुविधा प्रवाशांसाठी सुरु केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर 15 डबे असणाऱ्या लोकलच्या चार फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. तर छत्रपती शिवाजी टर्मिनल ते डोंबिवली दरम्यान दोन फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.

डोंबिवली येथून सकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे जाण्यासाठी पहिली लोकल धावणार आहे. तसेच सीएसएमटी येथून सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी डोंबिवली येथे जाण्यासाठी 15 डब्यांची पहिली लोकल ठेवण्यात आली आहे. या लोकलसाठी ठाणे,भांडूप, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या रेल्वेस्थानकांवर थांबण्याची सोय करण्यात आली आहे.