कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका भारतासह जगभरात अनेक बड्या अर्थव्यवस्थांना बसला आहे. दरम्यान महाराष्ट्रात 24 मार्च पासून लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक नोकरदारांना वेतनकपातीला सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये महाराष्ट्राची लालपरी म्हणजे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी (MSRTC) बसचादेखील समावेश आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट नुसार, बुधवार (24 जून) दिवशी एसटी कर्मचार्यांचे मे 2020 चे 50% वेतन कापण्यात आले आहे. त्याचा फटका राज्यातील 1 लाखाहून अधिक कर्मचार्यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसल्याने हा निर्णय घेतल्याचंदेखील सांगितलं जात आहे.
एसटी कर्मचार्यांना अद्याप मे 2020 चा पगार मिळालेला नाही. सामान्यपणे महिन्याच्या 7 तारखेला पगार होतो. पण लॉकडाऊनच्या काळात बस सेवा खंडीत झाल्याने त्याचा फटका कर्मचार्यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे हे नुकसान अंदाजे 6000 कोटींचे असल्याचे सांगितले जात आहे. लॉक डाऊन शिथील करताना काही प्रमाणात वाहतूकीला परवानगी दिली आहे. मात्र प्रवाशांअभावी आता एसटीला पैसा मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
एसटी मंडळाकडून त्यांच्या कर्मचार्यांच्या हाती किमान 25% पगार येईल यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एसटी महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे कर्मचार्यांचा पगार थकीत असल्याची घटना घडली आहे. टाईम्स ऑफ इंडिया शी बोलताना एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तात्पुरता त्रास आहे. लवकरच कर्मचार्यांना वेतन देण्यासाठी आणि समतोल साधण्यासाठी प्रयत्न केले जातील.