Shivshahi Bus Accident: शिवशाही बसला भीषण अपघात; 17 जण गंभीर जखमी
Accident Representational image (PC - PTI)

नांदेड येथील शिवशाही बसला भीषण अपघात (Shivshahi Bus Accident) झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही घटना तेलंगाणा (Telangana) राज्यातील कामारेड्डी (Kamareddy) येथे आज (14 फेब्रुवारी) पहाटे घडली आहे. या बसमध्ये वाहन चालक आणि वाहनवाहक यांच्यासह एकूण 38 प्रवासी होते. त्यापैकी 17 जण गंभीर झाले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यावरुन पलटल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, बसमधील वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

नांदेड आगारामधील शिवशाही बस शनिवारी हैदराबादसाठी आगारातून रवाना झाली होती. परंतु, तेलंगाणा राज्यातील कामारेड्डी येथे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बसला अपघात घडला आहे. बसचा चालक आणि वाहकासह सर्व जखमी प्रवाशांना कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावकार्याला सुरुवात केली. हे देखील वाचा- चंद्रपूर मध्ये 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरणकर्त्याने अभियंत्याची जिवंत जाळून केली हत्या

साताऱ्यात चार दिवसांपूर्वी (10 फेब्रुवारी) एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या 6 शिवशाही बसला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली होती. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी बसला आग लागली होती, मोठी इमारत होती. याशिवाय, मॉलदेखील जवळ आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.