प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

चंद्रपूर (Chandrapur) मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूरच्या घुग्घुस येथे वेकोली रामनगर वसाहतीत राहणा-या 25 वर्षीय अभियंत्याची जिवंत जाळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या अभियंताचे अपहरण करुन 28 दिवसानंतर 30 लाखांच्या खंडणीसाठी आज त्याची जिवंत जाळून हत्या केल्याचे समोर आले आहे. शुभम फुटाणे असे या मृताचे नाव आहे. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. गणेश पिंपळशेंडे असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शुभम फुटाणे 17 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जातो असे सांगून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्या दरम्यान शुभमच्या आईने एका अज्ञात इसमाने फोन करुन आपण त्याचे अपहरण केल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडून 30 लाखांची खंडणी देखील मागितली.हेदेखील वाचा- पूजा चव्हाण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले

या घटनेच्या दुस-या दिवशी घुग्घुस येथील डॉ.दास यांच्या रूग्णालयाजवळ शुभमची मोटरसायकल आढळली होती. तेव्हापासून स्थानिक गुन्हेशाखेचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, घुग्घुस पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र आज त्याच्या हत्येची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेने शुभमच्या कुटूबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी एका संशयितावर पाळत ठेवण्यात आली होती. एकूण तपासानंतर तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आणि आरोपी गणेशने देखील गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांनी शुभमचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केले असून त्याची अधिक चौकशी करत आहेत.