एमएसआरटीसी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांवरील निलंबन, बडतर्फी, बदल्या आणि फौजदारी आरोप मागे घेण्यासाठी तसेच नवीन कारवाईसाठी 23 डिसेंबर ही मुदत दिल्यानंतर, दोन दिवसांत तब्बल 2,369 कर्मचारी कामावर परतले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'फक्त दोन दिवसात पुन्हा ड्युटी सुरू करणाऱ्या लोकांची ही विक्रमी संख्या आहे आणि आमच्याकडे जवळपास 23,000 कर्मचारी आहेत जे आता राज्यभरातील 148 डेपोवर बस चालवत आहेत.' परंतु अजूनही 102 डेपो पूर्णपणे बंद राहिल्याने कामगारांच्या संपाचा गुरुवारी 57 वा दिवस उजाडला.
एमएसआरटीसी ने संपूर्ण महाराष्ट्रात 85 शिवनेरी आणि 367 शिवशाही बसेससह 3,600 बसेस चालवल्या. बेमुदत संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता 69,000 पेक्षा कमी आहे, परंतु यातील बरेच जण पुढील वर्षी 5 जानेवारी रोजी होणार्या पुढील न्यायालयीन सुनावणीची वाट पाहत आहेत. परंतु आज जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांना सेवेत पूर्ववत रुजू करुन घेतले जाईल. जे होणार नाहीत त्यांच्यावर उद्यापासून म्हणजेच 24 डिसेंबरपासून एसटी प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाणार आहे. (हेही वाचा: Mumbai Water Taxi: जानेवारी 2022 मध्ये सुरु होणार मुंबईमधील वॉटर टॅक्सी; जाणून घ्या प्रवासाचा मार्ग व दर)
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेले अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. 50 दिवसांहून अधिक काळ लोटूनही यावर काही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेसोबत यशस्वी शिष्टाई केली व त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटीचा संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
कामावर त्वरीत रूजू होणाऱ्या संपकरी कामगारांवरील निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती व बदली यांसारख्या सर्व कारवाया मागे घेऊन दफ्तरी दाखल करण्यात येतील, असे आश्वासनही देण्यात आले होते. यासाठी 23 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. परंतु संघटनेने संप मागे घेऊनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांपैकी बहुतांश कर्मचारी आज, गुरुवारी कामावर रुजू झाले नाहीत.