Dattatray Bharane | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण (Maharashtra Public Service Examination) झालेल्या उमेदवरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सेवा परीक्षा 2019 उत्तीर्ण झालेल्या 416 उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र दिले जाईल, अशी माहिती राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली आहे. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. या उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत राज्य सरकारने या आधीच जाहीर केले होते. मात्र, त्यात काही बदल झाल्याने विद्यार्थी न्यायालयात गेले होते. त्यामुळे निुयक्तीपत्रं द्यायला विलंब झाला. आता या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत बैठक बोलावण्यात आल्याचेही भरणे यांनी सांगितले.

राज्य सेवेत रिक्त असलेल्या जागांबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की, राज्य सरकार लवकरच 15 हजार जागांवर एमपीएससी तर्फे भरती करेन. त्यानुसार एमपीएससीकडे 7 हजार 168 पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आणखी वाढीव जागांसाठी एमपीएससीकडे मागणीपत्र देण्यात येणार असल्याचेही राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. (हेही वाचा, MPSC Twitter Handle: महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ट्विटर हँडल)

दत्तात्रय भरणे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोरोना महामारीचा फटका सर्व क्षेत्रांना बसला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना 1 वर्षांची वयोमर्यादा वाढवून देण्यात आल्याचेही भरणे यांनी सांगितले. कोरोना काळात परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांची मान्यता मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल असे भरणे यांनी सांगितले. दरम्यान, अर्ज दाखल करण्याची तारीख संपली असली तरी विद्यार्थ्यांना ही मुदत वाढवून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.