Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

MPCB Notice to Rohit Pawar: महाराष्ट्र प्रदूषण विभागाने (Maharashtra Pollution Control Board) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो (Baramati Agro) प्लांटला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मध्यरात्री 2 वाजता देण्यात आली आहे, अशी माहिती आमदारांनी 'एक्स'च्या माध्यमातून स्वत: दिली आहे. प्राप्त माहितीनुसार येत्या 72 तासात हा प्लांट बंद करण्याच्या सूचना नोटीसच्या माध्यमातून देण्यात आल्याचे समजते.

रोहीत पवार यांनी नोटीस प्राप्त होताच 'X'वर दीर्घ पोस्ट लिहीली आहे. त्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यासाठी मध्यरात्री दोन वाजता नोटीस पाठविण्यात आली आहे. दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन कोणता तरी द्वेश मनात ठेऊनच ही नोटीस पाठविण्यात आली आहे. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो. म्हणूनच मला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केला जातो आहे पण, मी युवा मित्रांना इतकेच सांगू इच्छितो की, संघर्ष करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. संघर्ष करताना अडचणी येणारच पण म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो, हीच मराठी माणसाची खास खासीयत आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

रोहीत पवार 'X' पोस्ट

राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे.

असो!

पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील.

दरम्यान, रोहीत पवार यांच्या 'X' पोस्टनंतर 'ते' दोन नेते नेमके कोण? ज्यामुळे त्यांच्या कंपनीला ही नोटीस पाठविण्यात आली याबातब राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. रोहित पवार यांचा अंगुलीनिर्देश नेमका कोणाकडे आहे, याबाबत विचारणा होऊ लागली आहे.