खासदार नवनीत राणा (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाने काही दिवसांपूर्वी 4 लाखाचा टप्पा ओलांडला. सध्या राज्यामधील अनेक नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. कालच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन झाले. त्यापूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती. याआधी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा  (Navaneet Kaur Rana) यांच्या कुटुंबातील 10 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले होते. आता नवनीत राणा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वतः नवनीत राणा यांनी आपल्या सोशल मिडियावरून ही बातमी दिली आहे.

नवनीत राणा आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते. मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी तसेच घरीच राहा, सुरक्षित राहा व शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे.’

पहा पोस्ट -

याआधी राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांची कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. रविवारी रवी राणा यांच्या वडिलांची कोरोनाची चाचणी सकारात्मक आली होती. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे नमुने घेण्यात आले होते. रवी राणा यांच्या आई, मुलगा आणि मुलगी, वहिनी आणि जावई तसेच इतर चार नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ श्यामसुंदर निकम यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर रवी राणा आई-वडिल व मुलांना घेऊन नागपूरला गेले होते, तिथे नवनीत राणादेखील होत्या. (हेही वाचा: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 137 जणांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा मृत्यू)

आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा अहवाल पॉझिटिव आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. राणा यांचा जनसंपर्क चांगला असल्याने संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.