महाराष्ट्रामध्ये आता दुचाकीस्वारांवर ट्राफिक पोलिस अधिक कटाक्षाने लक्ष ठेवणार आहेत. चालकासोबतच त्याच्या मागे बसणार्या प्रवाशालाही हेल्मेट घालावं लागणार आहे. सरकारने हा नियम लागू केला असला तरीही त्याची अंमलबजावणी काटेकोर पणे केली जात नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना आता दुचाकी वरून प्रवास करणार्यांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुचाकी चालक तसेच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला देखील सक्तीने हेल्मेट घालावं लागणार आहे. राज्यात दुचाकी वरून प्रवास करताना होत असलेल्या अपघातांची संख्या पाहता आता हा हेल्मेटसक्तीचा नियम काटेकोर पणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुण्यातही हेल्मेट सक्ती लागू होणार
पुण्यामध्ये 1 डिसेंबर पासून हेल्मेट सक्तीसाठी विशेष मोहिम राबवली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी District Road Safety Committee मध्ये बोलताना पुण्यात हेल्मेटसक्ती चा नियम कडक होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी जाहीर केले की 1 डिसेंबर 2024 पासून हेल्मेटशिवाय सरकारी कार्यालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये, शासकीय यंत्रणांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे आता बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. सर्वांनी या नियमाचे पालन करावे आणि इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे पुण्यात आता कामासाठी येणार्यांनाही हेल्मेट न घातल्यास दंड होणार आहे. Vivek Anand Oberoi ला विना हेल्मेट दुचाकीवर पडले महागात, अद्दल घडविल्याबद्दल अभिनेत्याने मुंबई पोलिसांचे मानले आभार, See Tweet .
महाराष्ट्रात आता पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मोटार वाहन कायद्यांतर्गत हेल्मेट नसलेल्या दुचाकी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत. हेल्मेट नसलेले चालक आणि हेल्मेट शिवाय मागे बसलेल्यांना दंड यामध्ये विभाजन केले गेले नव्हते. पण आता त्याचे विभाजन करून डाटा ठेवला जाणार आहे.