Monsoon (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाला सध्या सुरुवात झाली आहे. तर हवामान खात्याने येत्या 16 जुलै पर्यंत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याच दरम्यान आता सावंतवाडी, वेंगुर्ला येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी पुरासारखी परिस्थिती निर्माण झाले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे.(Maharashtra Monsoon 2020 Forecast: कोकण किनारपट्टीवर आज मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सर्वाधिक पाऊस वेंगुर्लात 141 मिलीमीटर ऐवढा पडला आहे. तर सावंतवाडी येथे 137 आणि कुडाळ येथे 115 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भ, पुणे शहरात अद्याप जोरदार असा पाऊस झालेला नाही मात्र पावसाची सद्य स्थिती सुद्धा समाधानकारक आहे. यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.(Monsoon Update: मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात काही भागात 16 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचे अंदाज- IMD)

कोकणामध्ये मात्र मागील काही दिवसांपासून पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरूच असून त्यामध्ये आज भर पडणार आहे. कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे मागील काही तासांत दरड देखील कोसळली होती. आता हळूहळू दरड कोसळल्याने मंदावलेली वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने काही ठिकाणी पूर सदृश्य स्थिती देखील पहावयास मिळाली.