CM Varsha Bunglow In BMC Defaulter List (Photo Credits: File Image)

मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईची 'तुंबापुरी' करुन टाकली असून मुंबईतील झोपड्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज सकाळपासून भिंत पडल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे खबरदारीची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाल्यांजवळील 4 मजली झोपडपट्ट्या तातडीने हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या धडक मोहिमेत कोणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत. तसेच संबंधित झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचे सुनिश्चित स्थलांतर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबईतील मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या स्थितीवरून मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटू लागले. त्यानंतर झालेल्या चर्चेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना झोपड्या हटवण्याचा कार्यक्रम जाहीर केला. मुंबईतील नाल्यांवर तसेच नद्यांच्या परिसरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर झाली असून, पाणी साचण्याच्या दृष्टीने मुंबईतील हीच मोठी समस्या असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचा- Maharashtra Monsoon 2019 Live Updates: मध्य रेल्वे काही प्रमाणात 'ट्रॅकवर' आणण्यास सुरूवात; CSMT कडून चार तर ठाणे - दादर विशेष ट्रेन सुरू

मुंबईतील नाल्यांवर तसेच मिठी नदीसारख्या नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले. त्याच प्रमाणे मुंबईतील नाल्यांचे, नद्यांचे काही ठिकाणी प्रवाह बदलण्यात आले असून असे प्रवाह बदलणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईतील नालेसफाईचे धोरण महापालिकेने तयार करून ते घोषित करावे, असे निर्देश आपण महापालिकेला दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.