Monsoon | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात मान्सून (Monsoon ) परतीच्या मार्गावर आहेत. तरीही पुढचे तीन दिवस पावसाच्या सरी कायम राहणार असा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय हामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे. तीन दिवसांनंतर मात्र हवामान बऱ्यापैकी कोरडे होईल. त्यामुळे दिवाळी (Diwali 2022) सणाला राज्यात पावसाकडून उघडीप मिळेल असा हवामान विभागाच अंदाज आहे. हवामान विभागाने माहिती देताना सांगितले की, परतीच्या पावसाने गेल्या दशकातील ऑक्टोबरमधील सर्वाधिक पावसाचा टप्पा ओलांडला आहे.

हवामान विभागाने पुढे अधिक माहिती देताना म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून शहरात (मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर) दुपारी 4 नंतर पाऊस हा नित्याचाच झाला आहे. असे असले तरी मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत देत आहेत. शुक्रवारी, मान्सूनने महाराष्ट्राच्या उत्तर भागातून माघार घेतली आणि आता आठवडाभरात राज्याच्या उर्वरित भागातूनही तो निरोप घेण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाच्या रुपात मान्सून पूर्णपणे माघारी परतण्यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. “आयएमडीने रविवार आणि सोमवार या दोन दिवसांसाठी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. बुधवारी हवामान कोरडे राहील, असे आयएमडीच्या अधिकाऱ्याने म्हटले. (हेही वाचा, Maharashtra Rain Updates: वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, राज्यभर परतीच्या पावसाचा कहर; शेतीचं मोठं नुकसान)

दरम्यान, ऑक्टोबरमधील पावसाने मुंबईत दशकातील सर्वोच्च टप्पा ओलांडला आहे. शनिवारी सकाळपर्यंत ऑक्टोबरमध्ये सरासरी 89 मिमीच्या तुलनेत 216 मिमी पावसाची नोंद झाली. 1998 मध्ये सर्वाधिक 376 मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी सांताक्रूझ वेधशाळेने 8 ऑक्टोबर रोजी 113 मिमी पावसाची नोंद केली, जो गेल्या दशकातील ऑक्टोबरमधील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे