Money Laundering Case: कार डिझायनर दिलीप छाब्रिया आणि कुटुंबाकडून तब्बल 18 कोटींचे लाँडरिंग- ED
Enforcement Directorate | (File Image)

Dilip Chhabria Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कार डिझायनर आणि डीसी डिझाईनचा संस्थापक दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria), त्याची बहीण आणि इतर पाच जणांवर गेल्या महिन्यात विशेष पीएमएलए न्यायालयासमोर सादर केलेल्या तक्रारीत, 18.13 कोटी रुपयांची लाँडरिंग केल्याचा आरोप केला आहे. छाब्रिया, त्याची बहीण कांचन, निहाल बजाज, त्यांचे फायनान्स मॅनेजर जितेंद्रकुमार यादव, रिझोल्यूशन प्रोफेशनल, दिलीप छाब्रिया डिझाईन, डीसी मोटर वर्क्स आणि डीसी ऑटोसॉफ्ट यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या तक्रारीची न्यायालयाने बुधवारी दखल घेतली. ईडीने दावा केला की, पीएमएलए तपासादरम्यान, सह-आरोपी संस्था, मेसर्स दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑपरेशनमधील विविध गैरप्रकार उघड झाले आहेत.

आरोपींनी सहआरोपी आणि कुटुंबातील सदस्य/कर्मचाऱ्यांच्या मदतीने मेसर्स डीएनके ड्रीमवर्क्सच्या नावाने डमी कंपनीची निर्मिती केली होती. या कंपनीचा वापर बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये (डीसीडीपीएल) अतिरिक्त शेअरहोल्डिंग कोणत्याही रोख रकमेशिवाय संपादन करण्यासाठी केला गेला.  छाब्रिया याने कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा गैरवापर केला  आणि 2016 नंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पगाराच्या रुपात तसेच DCDPL कडून अपवादात्मक वाढलेल्या भाड्याच्या पावत्यांच्या रूपात त्याने डीसीडीपीएलचा निधी पळवला.

दुसरीकडे, आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणारा कपिल शर्माने कार डिझायनर दिलीप छाब्रिया याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. कपिलचा आरोप आहे की त्याने दिलीप छाब्रिया याच्याकडून स्वतःसाठी कस्टमाइज्ड व्हॅनिटी व्हॅन मागवली होती. मात्र दिलीप छाब्रिया याने त्याला व्हॅनिटी व्हॅन दिली नाही. इतकेच नाही तर दिलीप छाब्रिया याने आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा कपिल शर्माने केला आहे. (हेही वाचा: IT Raid on Encounter Specialist Pradeep Sharma: करचोरी प्रकरणी आयकर विभागाची एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी)

दिलीप छाब्रियाविरोधात नोंदवलेल्या तीन एफआयआरच्या आधारे ईडीची केस करण्यात आली आहे. यापैकी एक फसवणूक प्रकरण म्हणजे कपिल शर्मा. ईडीला दिलेल्या निवेदनात कपिल शर्माचे प्रतिनिधी मोहम्मद हमीद यांनी सांगितले की, कपिल शर्माने 2016 मध्ये दिलीप छाब्रिया याच्याशी व्हॅनिटी व्हॅनसाठी संपर्क साधला होता. याबाबत, 2017 मध्ये दिलीप छाबरा डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड आणि कपिल शर्माची कंपनी यांच्यात 4.5 कोटी रुपयांचा करार झाला होता. कपिलच्या कंपनीने कराराच्या अटींनुसार दिलीप छाब्रियाला करासह 5.31 कोटी रुपये दिले. मात्र कपिलला ना व्हॅनिटी व्हॅन मिळाली ना पैसे. दरम्यान, 2020 मध्ये दिलीप छाब्रिया याच्यावर काही बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन गुन्हे मुंबईच्या सीआययू पथकाने तर एक गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला.