IT Raid on Encounter Specialist Pradeep Sharma: करचोरी प्रकरणी आयकर विभागाची एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी
Pradeep Sharma | Twitter

IT Raid on Encounter Specialist Pradeep Sharma: आयकर विभागाच्या (Income Tax Department) तपास शाखेने गुरुवारी सकाळी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) यांच्या मुंबईतील (Mumbai) निवासस्थानाची झडती घेतली. शर्मा यांचे अंधेरी पूर्वेतील चकला येथे निवासस्थान असून, तेथे आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माजी आमदार आणि खासदाराशी संबंधित तपासाचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला. माजी आमदारावर मोठ्या प्रमाणात करचोरी आणि बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे माजी राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी जोडलेले आहेत, त्यांचीही करचुकवेगिरीप्रकरणी चौकशी सुरू आहे. शर्मा यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त इतर काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. (हेही वाचा -Antilia Explosives Case: एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर NIA चा छापा; मोठ्या प्रमाणावर CRPF तैनात)

एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या शर्मा यांना याआधी मनसुख हिरण हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. शर्मा हे अँटिलिया स्फोटक प्लांट प्रकरणातील आरोपी आहेत, ज्यामध्ये मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मुंबई महानगर प्रदेशातील विरारमधून आमदारकीची निवडणूक लढवली होती, मात्र निवृत्तीनंतर निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. (वाचा - Pradeep Sharma Bail: सर्वाच्च न्यायालयाकडून माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना 3 आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर)

घनश्याम दुबे यांच्या घरावर आयटीचे छापे -

शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याबरोबरच आयटी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे माजी आमदार आणि व्यापारी घनश्याम दुबे यांच्या घराचीही झडती घेतली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी असलेले दुबे, त्याचा चालक हरी प्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.