Money Laundering Case: अनिल देशमुख यांना ED कडून पुन्हा समन्स; 2 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या पाठीमागे लागलेला ईडी (ED) चा ससेमिरा अद्याप सुरुच आहे. अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांना पुन्हा एकदा ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. सोमवार, 2 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) माजी मंत्र्यांसह मुलावर ही कारवाई करण्यात आली आहे. (Money Laundering Case: अनिल देशमुख यांना ED चा झटका; 4.20 कोटींची मालमत्ता जप्त)

यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांची 4.20 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. तसंच त्यांचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या 12 ठिकाणांवर छापेमारीही केली होती. त्यांच्या नागपूर, मुंबई येथील घरांवरही धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता ईडीची कारवाई पाहता देशमुखांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (ED च्या कारवाईवर माजी मंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया; 4 कोटींची संपत्ती जप्त केल्याने कोर्टात धाव, न्यायालयातील सुनावणी नंतर ईडी ऑफिसमध्ये जबाब नोंदवणार)

ANI Tweet:

परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे गंभीर आरोप केले आणि सचिन वाझे प्रकरणातून एक नवे प्रकरण समोर आले. यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण गाजल्यानंतर मुंबई हायकोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. अनिल देशमुखांनी हे आरोप फेटाळून लावत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र सीबीआयला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे याप्रकरणी देशमुखांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.