Western Railway च्या 36 स्थानकांचा होणार कायापालट; रेल्वे परिसरात उभारण्यात येणार आधुनिक उद्यानं
Western Railway (Photo Credits: File Photo)

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! लवकरच पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) 36 रेल्वे स्थानकाच्या परिसराचे रुपडं पालटणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या परिसरात आधुनिक उद्यानं उभारण्यात येणार आहेत. मटा ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 पर्यंत ही उद्याने उभारण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. रेल्वे परिसरात स्वच्छता राखली जावी यासाठी सरकारने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मोकळ्या जागा वापरात आणण्यासह पर्यावरणाचा समतोल राहील असे उद्यान उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

पश्चिम रेल्वेच्या 36 रेल्वे स्थानकांमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर हा उपक्रम अन्य स्थानकांमध्येही राबविण्यात येईल. रेल्वे स्थानकातील ३० टक्के भागामध्ये हे उद्यान उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय, या स्थानकांना ISO 14001:2015 हे प्रमाणपत्रदेखील देण्यात येणार आहे.

हेदेखील वाचा- Mumbai: ख्रिसमसच्या दिवशी मध्य रेल्वेचा Jumbo Block, अनेक गाड्या रद्द; जाणून घ्या कसे असेल वेळापत्रक

कोणकोणत्या स्थानकांत उभारण्यात येणार ही उद्याने

चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम, खार रोड, वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव रोड, वसई रोड, नालासोपारा, पालघर, बोईसर, विरार, उंबरगाव, वापी, बिलीमोरा, उधवाडा, नवसारी, उधना आणि सूरत या स्थानकांच्या परिसरात उद्याने उभारण्यात येणार आहे.

या रेल्वेस्थानकातील परिसरात मोकळ्या जागेत असणाऱ्या जागांवर उद्यानं उभारण्यासह पर्यावरणपूरक उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. अधिकाधिक पर्यावरणस्नेही बाबींनीयुक्त असे हे उद्यान असणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिकीट घराजवळील खिडकी, प्लॅटफॉर्मजवळील जागा, अथवा मोठ्या पादचारी पूलाच्या एका भागात हे उद्यान उभारणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.