ख्रिसमसच्या (Christmas 2019) दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी, मुंबईमध्ये (Mumbai) लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. यादिवशी रेल्वेचा तब्बल 5 तासांचा जंबोब्लॉक (Jumbo Block) असणार आहे. या दिवशी ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम होणार असल्याने हा जंबोब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान कोणत्याही गाड्या धावणार नाहीत. सकाळी 9.15 ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत या दोन स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
ख्रिसमसच्या सुट्टीचे निमित्त साधून रेल्वेने पादचारी पुलाचे काम हाती घेतले आहे. या ब्लॉकसह रेल्वेकडून एकूण 16 एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी पाच तासांमध्ये 400 मॅट्रिक टन वजनी 6 मीटर रूंदीचे 4 गर्डर उभारण्यात येणार आहेत. यामुळे तुम्ही जर का ख्रिसमसच्या दिवशी या 5 तासांमध्ये बाहेर पडत असाल तर तुम्हाला वाहतुकीसाठी लोकलसोडून इतर पर्यायी व्यवस्था वापरावी लागेल.
या ब्लॉकमुळे कल्याण-कर्जत-कसारा या मार्गावर विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या दर 20 मिनिटांनी सुटतील. तर दर 15 मिनिटांनी डोंबिवली-ठाणे-सीएसएमटी अशा विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुये कल्याणहून सीएसएमटीकडे येताना डोंबिवलीपर्यंत इतर पर्यायी वाहनाने यावे लागेल. सीएसएमटी ते ठाणे या गाड्या वेळापत्रकानुसार धावतील. (हेही वाचा: Mumbai Local Ladies' Special: मध्य रेल्वेवर धावणार CSMT- Panvel, CSMT- Kalyan या दोन नव्या महिला विशेष लोकल)
या ब्लॉकमुळे रेल्वेकडून काही लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये, सीएसएमटी-पुणे सिंहगड, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी-मनमाड पंचवटी, सीएसएमटी-मनमाड राज्यराणी, दादर-जालना जनशताब्दी, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर या गाड्यांचा समावेश होतो.