नाशिकमध्ये मॉब लिन्चिंगची घटना घडली आहे. गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाकडून एका तरुणाची हत्या करण्यात आली. तर या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. नाशिकमध्ये 15 दिवसातील ही दुसरी घटना असल्याने समाजकंटकांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून शहरात गुन्हेगारी देखील वाढली आहे. (हेही वाचा - Mumbai Shocker: प्रियकराने 19 वर्षांच्या प्रेयसीवर बलात्कार केला, श्रद्धा वालकरसारखी हत्या करण्याची दिली धमकी)
नाशिकच्या घोटी-सिन्नर हायवेवर एसएमबीटी कॉलेज समोर काल रात्री गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाकडून 2 तरुणांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला असू न दुसरा तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे तरुण आपल्या चारचाकी गाडीतून मांस घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेत आफान अन्सारी वय 25 या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोघेही तरुण मुंबईच्या कुर्ला येथील रहिवासी आहेत.
15 दिवसांपूर्वी देखील इगतपुरीमध्ये गोमांस तस्करीच्या संशयावरून अन्सारी नामक 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात 15 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेत राष्ट्रीय बजरंग दल नाशिक जिल्हा अध्यक्षासह 6 हल्लेखोरांना पोलिसांनी याप्रकरणी करत ताब्यात घेतले. उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहे.