MNS (Photo Credits: Twitter)

राज्यात दारुची दुकानं (Liquor Store) सुरु केली, मग मंदिरही (Temple) खुली करा, अशी मागणी पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पत्र लिहून केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत तीन वेळा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. देशातील तसेच राज्यातील लॉकडाऊन वाढवताना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली.

यावेळी राज्य सरकारने दारुबंदीवरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दारुची दुकानं सुरू आहेत. राज्यात दारुची दुकानं सुरु केली, मग आता मंदिरही खुली करा अशी मागणी मनसेने केली आहे. यासाठी अजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. (हेही वाचा -मुंबईमध्ये आज 791 नव्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर 20 जणांचा मृत्यू; 11 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE))

मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, अजय शिंदे यांनी या पत्रात म्हटलंय की, 'महाराष्ट्रात सध्या सर्वच गोष्टींना सुरुवात झाली आहे. सर्व प्रकारची दुकानं सुरु झाली आहेत. घरातून बाहेर पडल्यास रस्त्यावर गर्दी दिसते. मोलमजुरी करणाऱ्या परप्रांतीय मंडळीसाठी गाड्याही सुरु झाल्या. सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. दारुची दुकानं तर 2 ते 5 किलोमीटरच्या रांगा लावून सुरु आहेत. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेसाठी प्रत्येक दुकानाबाहेर 4 ते 5 पोलीस उभे आहेत. सर्व सुखदायक चित्र आहे. या सर्व गोष्टी सुरु असून कोरोनाचा प्रसार होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जनता काळजी घेत आहे. त्यामुळे आता योग्य त्या नियम अटी घालून राज्यातील मंदिरही मुक्त केली पाहिजेत.' राज्य सरकारने आपल्या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असंही मनसेने या पत्रात म्हटलं आहे. मनसेच्या या मागणीवर ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.