मीरा भाईंदर मध्ये मराठि अस्मितेच्या मुद्द्यावरून मनसेने आयोजित केलेल्या मोर्च्यावरून सध्या परिस्थिती चिघळल्याची परिस्थिती आहे. पहाटे पासूनच अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर अनेकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मनसेच्या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारत 144 कलम लागू केले. जमावबंदीचे आदेश दिलेले असताना कोणीही एकत्र जमू नये असे आवाहन पोलिसांनी केले असताना आता मनसे आपल्या मोर्च्यावर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही मराठी लोकांना दडपण्याचा पोलिस प्रयत्न करत असल्याचं सांगत आपणही मुंबई कडून मीरा भाईंदरकडे निघालो आहोत पोलिसांमध्ये हिंमत असल्यास त्यांनी मला अटक करावी असं खुलं आव्हान सरनाईकांनीही दिले आहे. नक्की वाचा:  Mira Bhayandar MNS Morcha: मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी पोलिसांची ची कारवाई, मनसेचे अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात.   

पोलिसांकडून मोर्चा मार्ग बदलण्याची विनंती

मनसे कार्यकर्त्यांकडून मोर्चा मार्गात बदल करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे च्या मोर्चाला परवानगी मिळेल पण त्यांनी त्यांच्या मार्गामध्ये बदल करवा. सध्या त्यांना ज्या ठिकाणी मोर्चा काढायचा आहे तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी पोलिसांनी आम्हांला घोडबंदर रोड वर मोर्चा काढायला सांगितल्याचं म्हटलं आहे. जर घटना मीरा भाईंदरची आहे तर मोर्चा घोडबंदरला का काढायचा असा सवाल त्यांनी विचारला आहे.

प्रताप सरनाईकही होणार मोर्च्यात सहभागी

पोलिसांनी मराठी अस्मितेवरून निघालेल्या मनसेच्या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकरात सुरू केलेल्या दडपशाहीचा निषेध केला आहे. स्थानिक आमदार म्हणून माझा या मोर्च्याला पाठिंबा आहे. आता मी देखील या मोर्च्यात सहभागी होत असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.

दरम्यान मनसे आणि उबाठा शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरले आहेत. संदीप देशपांडे यांनी पोलिसांना प्रति आव्हान करत आता जेल मध्ये जागा जास्त आहे की मराठी लोकांची एकजूट अधिक भक्कम आहे? हे आम्हांला बघायचं आहे असं म्हणत मोर्चा काढण्यावर आम्ही ठाम असल्याचं म्हटलं आहे. आज सकाळी मोर्चा स्थळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात तणाव वाढल्याचं चित्र पहायला मिळालं होतं.